#CoronaVirusEffect : राज्यातील पोलिसांवर वाढताहेत हल्ले !! तरीही महिनाभरात पोलिसांनी केली हि कामगिरी….

आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घेत असताना अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने घेरले आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका ५७ वर्षीय करोनाबाधित कॉन्स्टेबलचा आज नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनामुळे पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. वाकोला येथे ड्युटीवर असलेल्या सदर कॉन्स्टेबलला २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पोलीस कॉन्स्टेबल वरळी येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , एक मुलगी असा परिवार आहे.
आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात आता करोनाची लागण होऊन मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दलही हादरलं आहे. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात शनिवारी एका 71 वर्षीय डॉक्टरचा कोरोनानं बळी घेतला आहे. संबंधित डॉक्टर कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मालेगावमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.
पोलिसांवरील हल्ल्यात वाढ
डॉक्टरांबरोबर पोलिसांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असून या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १४८ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना ९६ पोलिसांना कोरोनाने बाधित केले असून त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६९, ३७४ गुन्हे दाखल झाले असून १४,९५५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत राज्यभरात पोलिस विभागाच्या १०० नंबर वर ७७, ६७० फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा ६०२ जणांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात पाठण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०८४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर सुमारे ४५१६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.