#CoronaVirusEffect : येत्या ३ मे नंतरच्या लॉकडाऊनवर नेमकं काय म्हणाले राजेश टोपे ?

राज्यात ३० एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले होते त्यानंतर म्हणजेच ३ मे नंतर काय होणार अशी चर्चा राज्यात सर्वत्र केली जात असतानाच याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो, असे संकेत टोपे यांनी दिले.
दुकाने उघडण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही….
याशिवाय महाराष्ट्रातील दुकाने उघडण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात १८ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत. तथापि, यासंदर्भात तसा कोणताही निर्णय झालेला नाही. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. करोनाचे राज्यात ५१२ कंटेनमेंट झोन आहेत. अशा ठिकाणी लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा प्रश्न नाही. हॉटस्पॉट झोनबाबतही मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, असे टोपे यांनी नमूद केले.
राज्यात ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद करून काही महत्त्वाच्या व्यवहारांना राज्य सरकार परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तविली आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. मुंबई प्रदेश महानगर क्षेत्र आणि पुणे प्रदेश महानगर भागात करोनाबाधित रुग्णसंख्या राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे मुंबई पुण्यातील लॉकडाऊनच्या कालावधीबाबतही मुख्यमंत्री यांच्या स्तरावर अंतिम निर्णय सोमवारनंतरच होऊ शकतो असे संकेत देतानाच, याविषयी त्यांनी स्पष्ट भाष्य करण्याचे टाळले आहे.
हॉटस्पॉट असलेल्या भागात जूनपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू होऊन महिना उलटला तरी महाराष्ट्रात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत देशाचा लॉकडाऊन संपला तरी राज्यातल्या हॉटस्पॉटमध्ये टाळेबंदी पुढचा किमान महिनाभर तरी सुरू राहील, असे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या सूत्रांनुसार, सध्या तरी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे परिसरात लॉकडाऊन उठणार नाही असे चित्र आहे. मुंबई उपनगरं आणि परिसर तसंच पुणे आणि परिसरात किमान जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू राहू शकेल. या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन, बस आणि दुकानं सुरू करण्याचं अधिक धोक्याचं ठरेल असे सांगण्यात येत आहे. या दोन शहर परिसरात सातत्याने वाढणाऱ्या कोरोनारुग्णांमुळे महाराष्ट्र राज्य सरकार चिंतेत आहे. कारण ही दोन शहरं राज्याच्या आर्थिक नाड्या पकडून आहेत. आता ही शहरं बंद असताना आर्थिक घडी नीट करण्यासाठी नवा प्लॅन आखायचा राज्य सरकार विचार करत आहे, असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.