Marataha Reservation : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

राज्यातील सर्व परीक्षा कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिवाय लॉक डाऊनमुळे शाळा, कॉलेजेसही बंद आहेत. पण करोनाच्या या संकटात सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा सामाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या बाबतच्या निर्णयानुसार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात या वर्षी मराठा आरक्षण कायम राहणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच मराठा आरक्षण प्रकरण प्रलंबित असल्याने यावर स्थगिती देता येणार नाही, न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याचिकाकर्त्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे २०२०-२१ म्हणजे यंदाच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेशही रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. ती मागणीही सर्वोच्च न्यायालयाने टाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. याचा फायदा पात्र असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना होणार आहे. मे २०१९ मध्ये नागपूर खंडपीठाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिला होता. खंडपीठाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.