नाशिकमधील झोपडपट्टीत भीषण आग , २५ ते ३० घरे आगीच्या भक्ष्यस्थानी…

आज सकाळी अचानक नाशिकच्या भीमवाडी झोपडपट्टीला भीषण आग लागली. याचवेळी एकामागोमाग सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकच हाहाकार उडाला आहे. या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील रहिवाश्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे.
नाशिकच्या गंजमाळ भीमवाडी झोपडपट्टीत हि भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या आगीच्या लोळात पंचवीस ते तीस घरे आगीत भस्मसात झाली आहेत. नाशिकच्या सारडा सर्कलजवळ ही भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे गंजमाळ भागातील झोपडपट्टी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमनगर परिसराला चहुबाजुनी या आगीनं घेरलं आहे.
आगीचा विळखा गावाला पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जवळपास १५० घरं या भागात आहेत. दरम्यान, आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजलं नसून घटनास्थळी मदतकार्य सुरू झालं आहे.