काश्मिरी युवकांवर हल्ले करणारांवर कठोर कारवाई करा : पंतप्रधान

देशभरात काश्मिरी युवकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमधील दोषींवर राज्य सरकारने कारवाई करावी, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
लखनऊ येथे एका जमावाने काश्मिरी युवकांना केलेल्या मारहाणीनंतर पंतप्रधानांनी ट्विट करत राज्य सरकारना कारवाई करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, देशात एकतेचे वातावरण असणे महत्त्वाचे आहे. लखनऊ येथे काही लोकांनी काश्मिरी युवकांना मारहाण केली. त्याविरोधात उत्तर प्रदेश सरकारने तातडीने कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशप्रमाणे अन्य राज्यांनीदेखील अशा घटनांविरोधात कठोर कारवाई करावी, असं आग्रहाने सांगू इच्छितो, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान, काश्मिरी युवकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने कारवाई करत यामधील ४ आरोपींना अटक केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात विविध कारणांसाठी वास्तव्य करत असलेल्या काश्मिरी तरुणांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.