#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत

A lot of state governments, as well as experts, are requesting Central Government to extend the lockdown. Central Government is thinking in this direction: Government sources pic.twitter.com/iDShmLIS8j
— ANI (@ANI) April 7, 2020
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये करोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लॉकडाउन वाढवणं गरजेचं असल्याचं सरकारला म्हटलं होतं. या मागणीवर सरकारनं विचार सुरू केला असून, १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाउन वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन वाढवणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, अनेक राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाउन वाढवण्याच्या मागणीवर विचार करण्यात येत आहे.
“अनेक राज्यांनी आणि तज्ज्ञांनी ही मागणी केली आहे. त्यादृष्टीनं केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात विचार करत आहे,” असं सरकारी सूत्रांनी सांगितलं. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन घोषित केला होता. लॉकडाउनला १४ दिवस पूर्ण झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाउनच्या काळात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती करोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. लॉकडाउन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलगांना, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारनं आधीच लॉकडाउन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.