#CoronaVirusUpdate : नोएडा येथे १४४ कलम लागू , चार पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर प्रशासनाची बंदी

करोना व्हायरसचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढू नये म्हणून केंद्र आणि राज्यसरकारच्या वतीने अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून नोएडा प्रशासनाने या धोकादायक विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता नोएडा भागात कलम १४४ लागू केलं आहे. जमावबंदी लागू झाल्यानंतर एकाच ठिकाणी चारहून अधिक व्यक्ती जमा होऊ शकत नाहीत. गौतमबुद्ध नगर पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या ऍडव्हायजरीप्रमाणे, जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, खेळ आणि व्यापारिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही.
उल्लेखनीय म्हणजे, बुधवारी नोएडामध्ये आणखीन एक करोना व्हायरसचा रुग्ण सापडलाय. नुकताच इंडोनेशियाच दौरा करून मायदेशात परतलेला हा नागरिक गौतमबुद्ध नगरचा रहिवासी आहे. चाचणी केल्यानंतर तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोविड १९ चे चार रुग्ण सापडल्याचं मुख्य आरोग्य अधिकारी अनुराग भार्गव यांनी म्हटलंय. नोएडा सेक्टर ४१ मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचे चाचणी नमुने चार दिवसांपूर्वी घेतले गेले होते. चाचणीमध्ये ही व्यक्ती करोना संक्रमित असल्याचं आढळलंय. त्याला उपचारासाठी ग्रेटर नोएडाच्या राजकीय जीआयएमएमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, देशात करोनाबाधितांची संख्या १५३ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत देशातील तीन जणांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत मात्र १४ जणांवर यशस्वी उपचारही झाले आहेत. परंतु अद्यापही करोनाचा धोका कमी झालेला दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री ८.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत.