Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने आज नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. धर्माधिकारी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची अधिसूचना मंत्रालयाने २४ फेब्रुवारीला जारी केली होती. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. धर्माधिकारी यांना मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आज केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली.

मुंबई उच्च न्यायालयात सध्या सर्वात वरिष्ठ असलेले न्या. धर्माधिकारी २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. बी. एस्सी (बायोलॉजी), बीए (इंग्रजी साहित्य) व एलएलबी असे शिक्षण घेतलेले धर्माधिकारी यांनी १९८०पासून नागपूरमध्ये वकिली सुरू केली. १५ मार्च २००४ रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी बढती मिळाली आहे. दरम्यान त्यांची इतरत्र नेमणूक केल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यांना आता मुंबई उच्चन्यायालयातच जबाबदारी देण्यात आली आहे.

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा जन्म नागपुरात २० एप्रिल १९५८ रोजी झाला. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात घेतले. त्यांनी बीएससी पदवी १९७७, विधी पदवी १९८० मध्ये नागपूर विद्यापीठातून प्राप्त केली. त्यानंतर नागपूर उच्च न्यायालयात १९८० मध्ये वकिली सुरू केली. प्रारंभी त्यांनी जबलपूर येथील वाय. एस. धर्माधिकारी याच्याकडे काही काळ वकिलीचे धडे घेतले. त्यानंतर एच. एस. घारे यांच्याकडे वकिली केली. दरम्यान, घारे हे दिवाणी न्यायाधीश झाल्यामुळे धर्माधिकारी यांनी स्वत:ची वकिली सुरू केली. त्यांनी राज्य सरकारची विविध महामंडळे, उद्योग, कर्मचारी संघटना यांचे खटले कामगार न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत लढवले. १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून विराजमान झाले. तर, १२ मार्च २००६ रोजी न्यायमूर्ती झाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!