#CoronaVirusUpdate : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना आता देण्यात येतील एचआय़व्ही’ची विषाणू प्रतिबंधक औषधे…

सध्या ‘करोना’ विषाणूच्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार दिले जात आहेत. त्यावर विशेष असे औषध उपलब्ध नाही. मात्र, ‘एचआय़व्ही’ची विषाणू प्रतिबंधक औषधे (एआरटी) ‘करोना’बाधित गंभीर रुग्णाला देता येऊ शकतात. त्याचा विशेष सकारात्मक परिणाम रुग्णांवर होत आहे. त्यामुळे ती औषधे देता येणे शक्य आहे. यापूर्वी राज्यात तीन रुग्णांना एचआयव्ही प्रतिबंधक औषधे देण्यात आली आहेत. – डॉ. अर्चना पाटील, आरोग्य संचालक
करोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षाच्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत १९ जणांना लागण झाली असून त्यात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक ११ जणांना लागण झाली आहे. तर पुण्यात ८ जणांना लागण झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली. दरम्यान, मुंबई, रत्नागिरी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने आजमितीला राज्यात रुग्णांची संख्या ४५ पर्यंत पोहोचली आहे. पुण्यात आतापर्यंत ३८७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर ३० जणांच्या चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तसेच ३८० जणांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय ५६ जण अद्याप नायडू रुग्णालय, पिंपरीचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. १२०३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.
दरम्यान ‘करोना’च्या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना एचआयव्हीची प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येत असून, त्याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यात तीन रुग्णांना ही प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली असून, गंभीर रुग्णांना ही औषधे देता येऊ शकतील, असा निर्वाळा राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिला. त्यामुळे चीनपाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘करोना’च्या संसर्गित रुग्णांना एचआयव्ही प्रतिबंधित दोन प्रकारची औषधे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘करोना’च्या संसर्ग झालेल्या रुग्णांना चीनमध्ये एचआयव्ही प्रतिबंधित (एआरटी) औषधे देण्यात आली. त्याबाबत केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) कळविण्यात आले आहे. त्यामुळे देशात ‘एचआयव्ही’ची औषधे ‘करोना’च्या बाधित रुग्णांना देण्यात येणार की नाही याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. त्याबाबत विचारता आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी माहिती दिली. ‘टॅमी फ्लू’बरोबर आता एचआयव्ही प्रतिबंधक औषधे रुग्णांना देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.