Corona Virus Effect : ऑनलाईन सर्च थांबवा !! सायबर भामटेही उतरले मैदानात….कोरोना व्हायरसच्या मॅपवर क्लिक करू नका !!

कोरोना व्हायरसची आपत्ती जगावर आलेली असतानाही याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर भामटे मैदानात उतरले असून तुम्ही कोरोना व्हायरसची ऑनलाईन माहिती शोधात असाल तर सावधान !! कोरोना व्हायरसची माहिती ऑनलाइन शोधणाऱ्या अनेकांना सायबर ठगांनी दणका दिला असल्याचे वृत्त आहे. या निमित्ताने मोबाईलवर किंवा संगणकावर टाकण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या मॅपवर चुकूनही क्लिक करू नका असे केल्यास तुमच्या स्मार्ट फोनमधील किंवा संगणकामधील सर्व आवश्यक माहिती आणि विविध पासवर्ड चोरीला जात आहेत. यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानाच जगात कोठे कोठे करोना व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेकजण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा सायबर भामट्यांनी घेतला आहे. त्यांनी करोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. नकाशाच्या या लिंकवर क्लिक करताच संगणकातील सर्व आवश्यक माहिती सायबर भामटे काढून घेत आहेत. त्यात पासवर्डसह डेटाही चोरला जात आहे. यामुळे हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाऊनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.