अखेर जोतिरादित्य भाजपवासी , राहुल गांधी यांनी दिली हि प्रतिक्रिया….

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशातील अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. शिंदे १३ मार्चला भाजपकडून राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसला मोठा धक्का देत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप प्रवेश केला. मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार यामुळे अडचणीत आलं आहे. ज्योतिरादित्य हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. आपल्या जवळच्या सहकाऱ्याने पक्ष सोडल्यानंतरही त्यावर राहुल गांधी यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून ज्योतिरादित्य यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही मिनिटातच ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून हटवल्याची घोषणा काँग्रेसतर्फे करण्यात आली. या बाबत राहुल गांधी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले कि , “आम्ही चांगले मित्र आहोत. ज्योतिरादित्य माझ्याबरोबर एकाच कँपसमध्ये होते. माझ्या घरी कुठल्याही वेळी येऊ शकेल अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकलो.” याशिवाय राहुल गांधी यांनी कुठलीही राजकीय प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही महिन्यांत ज्योतिरादित्य यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण राहुल यांनी त्यांना भेटायची वेळ दिली नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाऊ आणि त्रिपुराच्या राजघराण्यातील व्यक्ती प्रद्योत देबबर्मा यांनी ही माहिती दिली आहे. प्रद्योत देबबर्मा म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे यांनी कित्येक महिन्यांपासून राहुल यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पण त्यांना आमच्या नेत्याची मिळू शकली नाही.” देबबर्मा हे त्रिपुरा काँग्रेसचे नेतेही आहेत.
मध्य प्रदेशातील या राजकीय संकटावर मत करण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले विश्वासून सहकारी सज्जनसिंह वर्मा यांच्यावर नाराज आमदारांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली आहे. कमलनाथ यांच्यावर नाराज असलेले, ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आमदार बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये राहात होते. या सगळ्या नाराजांची समजूत काढण्यासाठी सज्जन वर्मा स्वत: बंगळुरूला जाऊ शकतात. काल संध्याकाळी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होती, त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती.
भाजप प्रवेशाच्या वेळी काय बोलले ज्योतिरादित्य ?
दिल्लीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश करताना ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसमध्ये वावरतानाची व्यथा स्वतःच व्यक्त केली. “वास्तवाला नाकारणं, नव्या विचारांना जागा न देणं, नव्या नेतृत्वाला मान्यता न मिळणं या वातावरणात काम करणं अवघड आहे. राष्ट्रीय स्तरावर हीच स्थिती आहे. तीच स्थिती माझ्या राज्यात – मध्य प्रदेशात आहे”, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मध्य प्रदेशच्या राजकारणाला धक्का देत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदे भावुक झाले. ‘माझं आयुष्य बदलणारं नवं वळण मी घेतलं आहे’, असं सांगताना त्यांनी वडील माधवराव शिंदे यांची आठवण काढली. ‘काँग्रेस पूर्वीची राहिलेली नाही. पक्ष बदलला आहे. त्यामुळे मी गेले काही दिवस व्यथित होतो. म्हणूनच मोठा निर्णय घ्यावा लागला’, असं सांगताना ज्योतिरादित्य यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास दर्शवला. ‘देशाचं भवितव्य पंतप्रधान मोदींच्या हाती सुरक्षित आहे’, असं ते म्हणाले.
“आयुष्यात अशी काही वळणं येतात, ज्याने आयुष्य बदलून जातं. तसे माझ्या आयुष्या २ दिवस महत्त्वाचे ठरले. पहिला दिवस ३० सप्टेंबर २००१ – ज्या दिवशी मी माझ्या पूजनीय वडिलांना गमावलं. या दिवसाने माझं आयुष्य बदललं. त्याबरोबर दुसरी तारीख १० मार्च २०२०. त्यांच्या ७५ व्या जयंतीचा दिवस. जीवनात नवं वळण या दिवशी घेण्याचा निर्णय मी घेतला”, असं ज्योतिरादित्य म्हणाले.