Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्य प्रदेशसारखे महाराष्ट्रात काही घडेल का ? शरद पवारांनी दिले हे उत्तर ….

Spread the love

काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे कमलनाथ सरकारमध्ये मोठी राजकीय उलथा-पालथ होत असून महाराष्ट्रातही अशी परिस्थिती निर्माण होईल का? अशी राजकीय चर्चा सुरू असतानाच  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले कि , ‘मध्य प्रदेशात सरकार हे गेले नाही. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, सिंधिया राजे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता. कदाचित तिथ कमी काही झाले असावे’, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच, ‘काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्त्व ही आहे आणि भविष्यही आहे’, असंही पवार सांगायला विसरले नाही. यावेळी, पत्रकारांनी मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवणार का असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांनी आपल्या शैलीत याचे उत्तर दिले. ‘मध्य प्रदेशात जे राजकीय नाट्य घडले आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रात काही येणार नाही. महाराष्ट्रातील  राजकीय स्थितीची मला जाण आहे. त्यामुळे मला वाटते इथं वेगळं काही घडेल असं वाटत नाही’, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान राज्यातील  ‘महाविकास आघाडीला १०० दिवस पूर्ण झाले आहे. १०० दिवसांमध्ये जे काम झालं ते चांगल्या प्रकारे झालं आहे. असं सांगत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या १०० दिवसाच्या कारभाराला १०० टक्के मार्क्स दिले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन केली आहे. शरद पवार यांनी मनसेच्या या भूमिकेवर टोला लगावला आहे. ‘एखाद्या पक्षाने सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी केले असेल तर चांगले आहे. मुळात काही तरी केले पाहिजे आणि लोकांसमोर गेले पाहिजे’, असा टोला पवारांनी मनसेला लगावला.

कोरोना आणि आयपीएलच्या सामन्याविषयी बोलताना ते म्हणाले कि , या सामन्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात. ते टाळले पाहिजे. कोरोना व्हायरस गंभीर दखल घेतली पाहिजे. शक्यतो सभा, मेळावे घ्यायला नको, असं आवाहनही पवारांनी केलं.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलले खा. संजय राऊत 

मध्य प्रदेशातील राजकीय अस्थितरतेवर भाष्य करताना महाराष्ट्रात आमच्यासारखे सर्जन बसलेत. मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. राज्यात जर असं कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला असून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिेंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार अस्थिर बनले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवेल का? या प्रश्नावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयोग करुन पाहिला मात्र ते यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कारण इथं ऑपरेशन थिएटरमध्ये आमच्यासारखे सर्जन बसले आहेत. जर असं कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल.” असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!