Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधकांची जय्यत तयारी

Spread the love

महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, हिंगणघाट जळीतकांड, धनगर आरक्षण, महिलांच्या सुरक्षितता, मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी, सुधारित नागरिकत्व कायदा आदी विषय मांडत विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६ मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

दरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ६ वाजता सभागृहांचे विरोधी पक्षनेते, गटनेते आणि ज्येष्ठ आमदारांना चहापान व चर्चेसाठी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आमंत्रित केले होते  मात्र, या चहापानावर विरोधी पक्षांनी प्रथा आणि परंपरेप्रमाणे  बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजकडून राज्यात ४०० ठिकाणी राज्य सरकारविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजप उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच शेतकरी कर्जमाफी करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत हल्लाबोल करणार आहे.

दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी  संवाद साधला. “आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकणार आहोत असं सांगत फडणवीस म्हणाले, “२६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा सन्मान करणारा प्रस्ताव विधिमंडळात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवावा. आधीच सरकार मधल्या घटक पक्षांमध्ये संवाद व्हावा. विरोधकांना चहापानाला बोलावण्यात येतं ते संवाद घडवून आणण्यासाठी पण सरकारमध्ये सुसंवाद होताना दिसत नाही,” अशी टीका फडणवीस यांनी केली.

महाविकास आघाडीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले कि , “ही युती प्राकृतिक नाही. त्यांच्यामध्ये वैचारिक भिन्नता आहे. हे तिन्ही पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा एनपीआर  आणि सीएएला पाठिंबा आहे, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण विरोध आहे. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका मात्र अद्याप समजू शकली नाही. यावरून या विषयावर तिन्ही पक्षांच्या तीन वेगळ्या भूमिका आहे ते स्पष्ट होतं,” असं फडणवीस म्हणाले. “एनआयएकडे अर्बन माओवादाचा तपास देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करणार आहे. त्यांनी स्वतः त्याबाबतचे पुरावे पाहिले असतील. त्याची व्याप्ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून, इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे. म्हणून याबाबत एनआयए तपासाची गरज आहे. सीएए आणि एनपीआर बाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि स्वागत करतो,” असे फडणवीस म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलींच्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात असल्याबाबत आरोप केले होते. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामधून त्यांच्या या विधानाला छेद मिळत आहे. त्यामुळे ते अशी विधान करून बुद्धिभेद करून दलित समाजामध्ये कॉन्फ्युजन निर्माण करू पाहता आहेत,” असं फडणवीस म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!