पंतप्रधानांच्या वाराणशी दौऱ्यात हातात काळा ध्वज घेत ताफयासमोर घेतली उडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीच्या दौऱ्यावर असून गेल्या सहा वर्षांतला पंतप्रधान मोदींचा हा २२ वा वाराणसी दौरा आहे. आपल्या या या दौऱ्यात त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूहून आलेल्या लोकांशी आणि संतांशी त्यांनी मराठी, तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये संवाद साधला. यावेळी वाराणसीला त्यांनी तब्बल १२०० कोटी रुपयांच्या योजनांची भेट दिली आहे . याच दरम्यान मोदींच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर एका तरुणानं अचानक उडी घेत मोदींना काळा झेंडा दाखवल्यानं काही क्षणासाठी उपस्थितांचा एकच गोंधळ उडाला. अजय यादव असं या तरुणाचं नाव असून तो समाजवादी पक्षाच्या नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान बीएचयूपासून पडाव (चंदौली) स्थित पंडीत दिनदयाळ स्मृतीस्थळाकडे पंतप्रधान रवाना झाले. यावेळी, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर एका तरुणानं अचानक उडी घेतली. या तरुणानं पंतप्रधान मोदींना आणि ताफ्यासमोर काळ्या रंगाचा झेंडा फडकावला. यामुळे क्षणभर सगळेच गोंधळले. परंतु, सुरक्षा व्यवस्थेतील कमांडोंनी तत्काळ या तरुणाला आपल्या ताब्यात घेतलं. दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधानांची वाराणसीला ही दुसरी भेट आहे. चंदौलीच्या पडावमध्ये मोदींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ६३ फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण केलं. जनसंघाच्या संस्थापकांपैंकी एक असलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ एक उपवन बनवण्यात आला आहे.