भाजपनेत्यांच्या सरकारवरील भविष्यवाणीला शरद पवारांनी दिले हे उत्तर …

भाजपचे नेते महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल अशी कितीही भविष्यवाणी करत असले तरी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. आम्ही खेड्यापाड्यात राहणारे लोक आहोत. आम्हाला ज्योतिष कळत नाही. ज्योतिष कळणारे लोक भाजपमध्ये जास्त आहेत. पण त्यांचं भविष्य खरं ठरत नाही आणि अजून चार वर्षे तरी त्यांचं भविष्य खरं होणार नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला.
जळगाव येथील जैन इरिगेशच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा तसेच महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आलेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांनी भाजपला खोचक टोले लगावले. आता तर भाजप ‘मिशन लोटस’ नावाने मोहीम उघडणार असल्याचे बोलले जात आहे. त्याने काहीएक फरक पडणार नाही. मध्यवधी निवडणुकांचीही चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा कोणी आणली, हे मला माहीत नाही. ही मध्यवधीची चर्चा माझ्या दृष्टीने निरर्थक आहे, असेही पवारांनी सांगितलं.
महिलांवरील अत्याचाराबाबत बोलताना पवार म्हणाले कि , महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब दुर्दैवी आहे. सरकार कोणाचेही असो महिलांवर अत्याचार होणं सरकारला शोभणारे नाही, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सीएए आणि एनआरसी कायद्यासंदर्भात सरकारने काहीही भूमिका घ्यावी. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्राच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. संसदेत आम्ही या कायद्याच्या विरोध मतदान केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्व जागा जिंकणाऱ्या भाजपला विधानसभा निवडणुकीत मात्र, अवघ्या ८ जागा मिळाल्या. याठिकाणी भाजपने मोठा प्रचार केला होता. या निवडणुकीसाठी भाजपने पक्षाची पूर्ण ताकद, पैसा लावला होता. देशभरातील आजी-माजी मंत्री, नेत्यांना दिल्ली निवडणुकीच्या कामात लावले होते. मात्र, तरीही केजरीवाल जिंकले. भाजपने हिंदू-मुस्लिम असे वातावरण निर्माण केले होते. दिल्लीतील मतदारांनी भाजपचे हे षडयंत्र हाणून पाडलं. दिल्लीत सर्व धर्माचे, प्रांताचे लोक राहतात. त्यामुळे दिल्ली हे शहर नाही तर ‘मिनी इंडिया’ आहे. या ‘मिनी इंडिया’ने भाजपविरोधात कौल दिला. त्यामुळे दिल्लीच्या जनतेचे मी आभार मानतो, असे पवार म्हणाले.