राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका ,राजकीय गरजेपोटीच देशात आपत्ती : शरद पवार

भाजपाने राजकीय गरजेपोटी देशात आपत्ती आणली अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. एवढंच नाही तर शेतकऱ्यांशी खोटं बोलणाऱ्या या सरकारला हद्दपार करा असं आवाहनही शरद पवार यांनी केलं. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचीही उपस्थिती होती. राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करणार आहे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.
ज्या राज्यांत भाजपाची सत्ता होती, ती राज्ये भाजपाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होणारच असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ म्हणाले की, पराक्रमी सैन्य आपल्या देशाला लाभले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याला अधिक बळकटी दिली. या अगोदरही अनेक लढाया झाल्या, मात्र कुठल्याही पक्षीय राजकारणात त्यांचा कधीही वापर केला गेला नाही. मात्र सध्याचे मोदी सरकार सैन्याच्या कारवाईचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करते आहे असा आरोप केला.