खळबळजनक : नाशिकच्या लासलगाव बसस्थानकावर विधवेला पेटवून दिले , चार जण फरार , एक संशयित ताब्यात

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याची घटना , औरंगाबादेत शरीर सुखाची मागणी करीत महिलेला जाळून मारल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे पण तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले . या महिलेला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असतानाच हि घटना घडली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सादर महिला विधवा असून ज्या युवकासोबत तिचे अनैतिक संबंध होते, त्या युवकाचा साखरपुडा मोडण्यासाठी त्या महिलेने प्रयत्न केल्याने त्याचा राग मनात धरून त्या युवकाने आज पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले होते. या तरुणीचा सात दिवसानंतर नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. तसेच औरंगाबादेत सिल्लोड तालुक्यातही शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बिअर बार चालकाने महिलेला जाळले होते . या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सून्न झालेला असतानाच आता नाशिक जिल्ह्यातही विधवा महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर वळणावर पोहचला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही महिला ४० टक्के भाजली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. पीडित महिला ही लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या गावात राहणारी आहे. या महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस फरार तरुणांचा शोध घेत आहे.