हिंगणघाट जळित प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना राज्य शासनाची १० लाखांची मदत , तर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची ग्वाही…

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सून्न झाला असून पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालकल्याण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी याबाबत माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे कडू यांनी नमूद केले. या प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, हा सरकारचा प्रयत्न असणार आहे, असेही कडू म्हणाले.
दरम्यान शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार हिंगणघाट जळीत हत्या प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेत तपासात कुचराई होऊ दिली जाणार नाही. पीडिता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा रितीने चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.