विवाहित मुलीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून आईने पोलीस ठाण्यासमोरच पेटवून घेतले !!

नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यासमोरच विवाहित मुलीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका ५५ वर्षीय महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला होरपळली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील टकले नगर येथील अमनप्रित संधू (वय २७) हिचं गेल्याच महिन्यात छत्तीसगडमधील रायपूर येथील राजिंदर पाड्डा याच्याशी लग्न झालं होतं. हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून देण्यात आलं होतं. लग्नानंतर आठवडाभरातच तिचे पतीसोबत खटके उडू लागले. पतीकडून तिला शिवीगाळ आणि मारहाण होऊ लागली. दोनच दिवसांपूर्वी तिनं रायपूर येथील घर सोडलं आणि तिच्या मैत्रिणीकडे येऊन राहू लागली. आज तिचे वडील पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर मुलीलाही पोलिसांनी बोलावून घेतलं. त्यानुसार ती पोलीस ठाण्यात आली. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिनं वडिलांच्या घरी आणि रायपूर येथे सासरी जाण्यास नकार दिला. हा वाद तिच्या आईला असह्य झाला. यातून आईनं दिंडोरी रस्त्यावरील पंचवटी पोलीस ठाण्यासमोरच स्वतःला पेटवून घेतलं. यात ती होरपळली असून, प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.