हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिका जळित प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात येणार असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच आरोपीला फाशीवर लटकावण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणारन नाही, आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून जलदगतीने प्रयत्न करण्याचे आणि सर्व यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या अशा गोष्टी कदापिही खपवून घेतल्या जाणार नाहीत. स्त्री-सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घरा-घरात उजळणी करावी लागेल, असेही ते म्हणाले. सदर तरुणीच्या मृत्यूनंतर दारोडा गावातील ग्रामस्थांचा उद्रेक झाला असून या ग्रामस्थांनी रास्तारोकोही केला आहे. या बाबत मुख्यमंत्री म्हणाले की, भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो, थोडासा धीर धरा. आरोपींना शिक्षा केली जाईलच. आपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: शांत बसणार नाही. स्त्रियांवरील अत्याचाराबाबतचा हैदराबाद येथे जो कायदा आहे, त्यात सुधारणा करून महाराष्ट्रातही कठोर कायदा तयार करण्यात येईल, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
बाळासाहेब थोरात
दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे कि , हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या प्रकरणी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. हिंगणघाटची घटना महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी आहे. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवलेले आहे. अशा घटना पुन्हा घडू नये आणि आरोपीला जरब बसावी यासाठी आणखी कठोर कायदा करण्याचेही राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असं थोरात यांनी सांगितलं.