दुःखद बातमी : हिंगणघाट पीडितेचे पहाटे निधन , मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली…

हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या ७ दिवसांपासून पीडितेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, सुरू असलेल्या औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तरुणीच्या शरीरातील प्राणवायुचे घटते प्रमाण काळजीची बाब झाली होती. रविवारी मध्यरात्रीपासून पीडितेची प्रकृती अत्यंत खालावली. पीडितेचे ब्लड प्रेशर हळूहळू कमी होत गेल्यानंतर सकाळी तिला दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिली.
पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी जंतुसंसर्गाशीही झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आले होते. दरम्यान ‘आमच्या मुलीला जो त्रास झाला तो त्या नराधमालाही व्हायला हवा. माझ्या मुलीला तातडीने न्याय मिळाला पाहिजे. त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.
दरम्यान, आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळेला २० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. नगराळेने ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७च्या सुमारास सदर तरुणीचा पाठलाग केला होता. सदर तरुणी हिंगणाट शहरातील चौकात येताच अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा त्याने प्रयत्न केला. यामध्ये ही तरुणी ४० टक्के भाजली होती. तरुणीचा चेहरा, गळा आणि छाती भाजल्या गेल्याने तिला श्वसनास त्रास होत होता. तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज अखेर तिचा मृत्यू झाला.
गावातील शोकाकुल नागरिक संतप्त
गेले सात दिवस तिचे आई-वडील, नातेवाईक आणि गावातील काही लोक या हॉस्पिटलमध्येच होते. आज या तरुणीच्या मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली. गावातील पेटलेल्या अनेक चुली विझल्या. दारोड्यातील ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे दुकाने बंद केली. काही ग्रामस्थांनी गावातील चौकात येऊन या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीलाही पेट्रोल टाकून जाळण्याची मागणी केली. आरोपीला तात्काळ शिक्षा करा, निर्भयाप्रकरणा सारखा हा खटला लांबवू नका, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
हिंगणघाट जळीतकांडानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दारोडा गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळताच गावात पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. गावात सुमारे तीनशे पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. गावात पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत असून गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
पीडितेच्या भावाला नोकरी , जलदगती न्यायालयात खटल्याची सुनावणी : अनिल देशमुख
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येणार असून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात कामही सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. हिंगणघाट जळीतकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. या खटल्याचं कामकाज उज्ज्वल निकम पाहणार आहेत. त्यांनी कामही सुरू केलं असून निकम हे पोलिसांच्या संपर्कात आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असाच सरकारचा प्रयत्न राहणार आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. पीडित तरुणीच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पुन्हा एकदा निकम यांच्याशी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललो. या दोघांचीही येत्या एक-दोन दिवसांत बैठक होणार असल्याचंही ते म्हणाले.
लाजिरवाणी घटना , पीडितेला न्याय मिळवून देऊ : अजित पवार
हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशीलपणे व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हिच हिंगणघाट हल्यातील पीडितेला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.