देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत !! महाराष्ट्रात एनआरसी लागू होणार नाही, छगन भुजबळ यांचा राज यांना टोला

“देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत. आता नवे शस्त्र आले आहेत”, असा टोला छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महामोर्चानंतर आझाद मैदानात केलेल्या भाषणात “दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल”, असा इशारा दिल्यानंतर त्यांच्या याच इशाऱ्यावरुन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना हा चिमटा काढला आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होते.
“मी ज्यावेळी गृहमंत्री होतो तेव्हादेखील घुसखोरांची समस्या होती. पोलीस घुसखोर बांगलादेशींना परत बॉर्डरवर सोडून येतात. पण घुसखोर पुन्हा येतात. आता त्यांना रोखणं भारत सरकारचं काम आहे. केंद्र सरकारने सीमेवर सुरक्षा वाढवावी किंवा दुसरी काहीतरी सुरक्षित उपाययोजना करावी”, असा सल्ला छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला दिला.
यावेळी छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “कोण कुणाला पाठिंबा देईल आणि कोण कुणाला विरोध करेल, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांनी एनआरसी महाराष्ट्रात लागू करु देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तिच भूमिका आमचीसुद्धा आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले. “देशाच्या नागरिकांना त्रास होणार नाही. जे खरेखुरे देशाचे नागरिक आहेत त्यांची सोय प्रथम केली पाहिजे”, असंदेखील मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.