Air Strike : आम्ही फक्त टार्गेटवर लक्ष ठेवतो , किती मेले हे बघत नाही : बी. एस. धनोआ

‘लक्ष्यावर हल्ला चढवणं हे आमचं काम आहे. एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सांगणं आमचं काम नाही. ते सरकार सांगेल, असं धनोआ यांनी सांगितलं. ‘जैश’च्या कॅम्पवर भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले? हे सरकारने जाहीर करावे अशी मागणी होत आहे. पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला जात आहे. एअर स्ट्राइकनंतर प्रथमच हवाई दल प्रमुख धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली. आम्ही लक्ष्य निश्चित केलं होतं आणि त्यावरच अचूक निशाणा साधला.
जंगलात बॉम्ब टाकले असते तर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली नसती. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याची आकडेवारी सरकारच सांगू शकेल, असं ते म्हणाले एअर स्ट्राइकमध्ये मिग २१ चा वापर का करण्यात आला, याचं उत्तरही धनोआ यांनी यावेळी दिलं. मिग २१ हे आमचं लढाऊ विमान आहे. ते अपग्रेड करण्यात आले आहे. जी विमाने आमच्या ताफ्यात आहेत, त्यांचा वापर आम्ही युद्धात करतो. अजूनही आमची मोहीम सुरुच आहे. यापेक्षा अधिक माहिती आता देऊ शकत नाही, असंही धनोआ यांनी स्पष्ट केलं. विंग कमांडर अभिनंदन यांच्या तंदुरुस्तीची तपासणी सुरू आहे. तंदुरुस्त असतील तर ते पुन्हा लढाऊ विमानाचे उड्डाण करू शकतील, असंही ते म्हणाले.
‘ठणठणीत झाल्यावर पुन्हा जेट उडवू शकतील अभिनंदन’
अभिनंदन यांच्या सध्या आरोग्य चाचण्या सुरू आहेत. आवश्यकता असेल तर त्यांच्यावर आणखी उपचार करण्यात येतील. एकदा का ते आरोग्यदृष्ट्या फीट झाले की पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होतील, अशी माहिती धनोआ यांनी सुलुर येथे दिली. भारतीय हवाई दलात मेडिकल फिटनेसला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं, असंही धनोआ यांनी सांगितलं. आपल्याला लवकरात लवकर पुन्हा कर्तव्यावर दाखल व्हायचं आहे, अशी ईच्छा अभिनंदन यांनी व्यक्त केली आहे. अभिनंदन यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते.