शरीर संबंध ठेवण्याच्या वादातून पुरुषाची हत्या , आरोपी गजाआड

शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने “त्या” दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्यांच्यापैकी एकाने शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून सुटकेस घेऊन जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पकडले आणि या खुनाला वाचा फुटली. डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, डोंबिवली पोलिसांनी अवघ्या ९ तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील बागशाळा मैदानाशेजारी असलेल्या झुडूपात आज सकाळी एका ५३ वर्षीय व्यक्तीचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाबाबत अधिक तपास केला असता मृत व्यक्ती ही उमेश पाटील असल्याची ओळख पटली. ओळख पटताच ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासात डोंबिवली येथे राहणारा प्रफुल्ल पवार या २७ वर्षीय तरुणाला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबानुसार आरोपी प्रफुल्ल पवार आणि उमेश पाटील यांची ६ महिन्यांपूर्वी रेल्वेत प्रवासा दरम्यान ओळख झाली होती. या ओळखी नंतर दोघांचे शारीरिक संबंध जुळले अनेक महिने हे शारिरीक संबंध सुरुच होते काही दिवसांपूर्वीच आरोपी प्रफुल्ल पवार याचे लग्न झाले त्यानंतर प्रफुल्ल ने उमेश पाटील यांच्याशी शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला ज्यामुळे प्रफुल्ल आणि उमेश यांच्यात वाद होऊ लागले. बुधवारी रात्री प्रफुल्ल आणि उमेश यांच्यात जोरदार भांडण झाले ही भांडणे मारहाणीपर्यंत गेले. ज्यात प्रफुल्लने उमेश पाटील यांची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरुन डोंबिवली पश्चिमेतील बाग शाळा मैदाना जवळील झुडूपात टाकला होता. अटक केल्यानंतर प्रफुल्ल पवारने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अवघ्या ९ तासांमध्ये आरोपीला अटक करून प्रकरणाचा छडा लावला.