निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील चारही दोषींना एकाचवेळी फाशी , दिल्ली न्यायालयाने सर्वांनाच घेतले फैलावर

लवकरच दोषींना फाशीची शिक्षा : लोकसभेत दिली कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हमी
दिल्ली हायकोर्टाने निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची केंद्र आणि दिल्ली पोलिसांची याचिका फेटाळली. सर्व दोषींना एकत्रच फाशी होईल, असे निर्देश कोर्टाने दिले. याशिवाय कोर्टाने सर्व दोषींना ७ दिवसांच्या आत सर्व कायदेशीर मार्ग अवलंबण्याची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे या सात दिवसांच्या आत दोषींना पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्याची मुदत आहे. निर्भया खटल्यातील चारही दोषींना फाशी झाली आहे. मात्र ही फाशी कायद्यातील तरतुदींमुळे दोन वेळा टळली आहे. कायद्यातील पळवाटा शोधून, दोषी आरोपी फाशी लांबवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र आता हायकोर्टाने त्यांना केवळ ७ दिवसांचीच मुदत दिली आहे. कोर्टाने लांबलेल्या फाशीवरुन प्रशासनालाही धारेवर धरीत आठवडाभरात नवीन डेथ वॉरंट लागू करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना एकत्रच दोषी ठरवलं. दोषींचा गुन्हा क्रूरतेचा कळस होता, शिवाय त्याचा समाजावर मोठा आघात झाला. मात्र संविधानाच्या कलम २१ नुसार काही कायदेशीर मार्ग आहेत, ज्याचा उपयोग करुन आरोपींनी फायदा उचलला. दोषींना खूपच वेळ मिळाला. २०१७ मध्येच याचिका फेटाळल्यानंतरही डेथ वॉरंट जारी झालं नाही. त्याबाबत कुणीच हरकतही घेतली नाही, अशा परखड शब्दात न्यायालयाने सुनावले.
2012 Delhi gang-rape case: Delhi High Court observes that Delhi prison rules do not state that if mercy petition of one convict is pending, the execution of the other convicts can take place pic.twitter.com/4GFfoU9Mhe
— ANI (@ANI) February 5, 2020
या प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) या चार दोषी आरोपींची फाशी दोनवेळा टळली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या ७ जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेट वॉरंट जारी केले होते . त्यानुसार या चौघांना आधी २२ जानेवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानुसार १७ जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आले . या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता. मात्र दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात केल्याने १ फेब्रुवारीची फाशी टळली होती.
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी ६ नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर २०१३ मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
लवकरच दोषींना फाशीची शिक्षा : लोकसभेत दिली कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हमी
दरम्यान कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लवकरच दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येईल अशी हमी लोकसभेत दिली. “आम्ही अत्यंत कठोरपणे पाठपुरावा करत आहोत. लवकरच निर्भयाला न्याय दिला जाईल. दोषींना लवकरच फासावर लटकवलं जाईल,” अशी माहिती रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी लोकसभेत दिली. गेल्या आठवड्यात ट्रायल कोर्टाने दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलली होती. केंद्राची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी दोषी कायद्याचा गैरवापर करत असून फाशीची शिक्षा लांबवत असल्याचं न्यायालयात सांगितलं आहे. दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असंही मत यावेळी त्यांनी नोंदवलं होतं.
2012 Delhi gang-rape case: Delhi High Court dismisses Centre's plea challenging trial court order which had stayed the execution of all 4 convicts. Court says death warrant against all 4 convicts can't be executed separately. https://t.co/OYU4r1tyDM
— ANI (@ANI) February 5, 2020