Crime Update : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना तहसीलदारास रंगेहात अटक

बीड जिल्ह्यातील गेवराई तहसील पारिसरात आज दुपारी अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदारासह खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे. गेवराईत झालेल्या कारवाई महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि , गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे आणि इसम माजीद शेख असे पकडलेल्या लाचखोरांची नावे आहेत. अवैध वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर सोडण्यासाठी तक्रारदारास 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. गेवराई तहसील परिसरात पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.