प्रजासत्ताक दिन विशेष : कोणाला मिळाले यंदाचे पद्म पुरस्कार जाणून घ्या…

देशभरातील ११८ नामवंतांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. ‘बीजमाता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे, अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप नेते अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे, तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मरणोत्तर पद्मभूषण सन्मान जाहीर झाला आहे. बॉक्सर मेरी कोम यांच्यासह एकूण ७ जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाले आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह १६ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, दिवंगत अरुण जेटली, दिवंगत सुषमा स्वराज, दिवंगत विश्वेशतीर्थ स्वामी श्री पेजावर अधोखजा मठ उडुपी, अनिरुद्ध जुगनौथ जीसीएसके, छन्नुलाल मिश्रा, मेरी कोम यांना पद्मविभूषण सन्मान घोषित करण्यात आला आहे. तर एम. मुमताज अली, सय्यद मुआझ्झीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. सेरिंग लँडोल, आनंद महिंद्रा, नीलकांत मेनन (मरणोत्तर), मनोहर पर्रिकर (मरणोत्तर), जगदीश शेठ, पी. व्ही. सिंधू, वेणू श्रीनिवासन हे पद्मभूषण सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. निरक्षर असूनही राहीबाईंनी अहमदनगरमधील आदिवासी भागात कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैविक बियाणांची बँक चालवत असल्यामुळे त्या ‘बीजमाता’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलं आहे. तर जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर
महाराष्ट्रातील एकूण ११ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून त्यात क्रिकेटपटू झहीर खान, डॉ. पद्मावती बंदोपाध्याय, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सय्यदभाई, डॉ. सुरेंद्र डेसा सौजा आणि सुरेश वाडकर आदींचा समावेश आहे.
याशिवाय जगदीप लाला आहुजा (सामाजिक कार्य), मोहम्मह शरीफ (सामाजिक कार्य), जावेद अहमद टाक ( दिव्यांगासाठी कार्य), तुलसी गौडा (पर्यावरण), सत्यनारायण मुंदायूर (शिक्षण क्षेत्रातील कार्य), अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य), उषा चौमूर (सामाजिक कार्य), हरेकला हजब्बा (शिक्षण क्षेत्रातील कार्य), अरुणोदय मंडल (आरोग्य क्षेत्र), राधामोहन आणि साबरमती (कृषी क्षेत्रातील कार्य), कुशल कोनवार सरमा (प्राण्यांसाठी कार्य), त्रिनीटी साईओ (कृषी क्षेत्रातील कार्य), रवी कन्नन (आरोग्य), एस रामकृष्णन (दिव्यांगांसाठी कार्य), सुंदरम वर्मा (पर्यावरण), मुन्ना मास्टर (कला), योगी अॅरोन (आरोग्य क्षेत्रातील कार्य), हिंमत राम भांभू (पर्यावरण कार्य) आणि मुजीक्कल पंकजाक्षी (कला क्षेत्र) आदींना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.