Aurangabad Crime : अमोल घुगेची हत्या करणारे दोघे गजाआड, दोघांना १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

औरंंंगाबाद : किरकोळ कारणावरुन चौघांनी अमोल नारायण घुगेचा खून केला होता. याप्रकरणी पसार असलेल्या दोन मारेकNयांना सिडको पोलिसांनी मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरातून मंगळवारी (दि.१५) पहाटे सुमारास अटक केली. सौरव नाना वानखेडे (वय २२, रा. त्रिवेणीनगर, एन-७, सिडको) आणि रितेश उर्फ विक्की भगवान पुसे (वय २२, रा. अयोध्यानगर, एन-७, सिडको) अशी अटक केलेल्या मारेक-यांची नावे असून दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.यु.न्याहारकर यांनी दोघांना १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
३१ डिसेंबरच्या पार्टी करण्याच्या उद्देशाने अमोल घुगे याला सौरव वानखेडे, गौरव वानखेडे, शुभम विसपुते आणि रितेश उर्फ विक्की पुसे यांनी रात्री वाजेच्या सुमारास घरातून नेले होते. घरापासून नजीकच्या असलेल्या अयोध्यानगरातील उद्यानात चौघांनी ओली पार्टी केली. या पार्टीत किरकोळ कारणावरुन वाद झाल्यानंतर चौघांनी अमोलला बेदम मारहाण केली. याचवेळी त्याच्या पोटात हत्याराने वार केला होता. रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळलेल्या अमोल घुगेचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे घाबरुन गेलेल्या चौघांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीतील पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाला. त्यानंतर चौघांनी चेंबरमध्ये त्याचा मृतदेह टाकून ढापा बंद केला होता. पुढे सौरव वानखेडे व रितेश पुसे हे दोघेही नागपुरच्या दिशेने पसार झाले होते. तर गौरव वानखेडे आणि शुभम विसपुते शहरातच होते.
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी गौरव वानखेडे व शुभम विसपुते यांना अटक केली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून हर्सुल कारागृहात असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.