जालना : हत्या सुपारी प्रकरणात जामिनावर असलेल्या व्यापाऱ्याचा गोळ्या घालून खून

जालना : परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांची शनिवारी रात्री ११ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पोखरीजवळ गोळ्या घालून हत्या केली. राजेश नहार शनिवारी रात्री कारने परतूरहून जालन्याकडे येत होते. पोखरीजवळ हल्लेखोरांनी कारवर गोळीबार केला. यात नहार गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिस व जालन्यातील लोकांनी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तपासाचे आदेश दिले आहेत. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर हेही उपस्थित होते. भर रस्त्यात घडलेल्या या गोळीबार आणि हत्या प्रकरणाने जालना जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील डांबरी गावाजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री राजेश नहार हे वाहनातून जात होते. त्या दरम्यान, जालना – वाटूर महामार्गावर पोखरी पाटी नजिक ते आले असता त्यांच्यावर अज्ञातांनी अचानक गोळीबार केला. त्यात हल्ल्यात नहार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून या घटनेमुळे परतूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध व्यापारी विमलराज सिंघवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल नहार यांना अटक झाली होती. याशिवाय जालना येथीलच उद्योजक गौतम मुनोत यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी नहार यांनीच सुपारी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या दोन्ही प्रकरणात नहार जामिनावर होते.