ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

रंगभूमीचे खरे नटसम्राट, चतुरस्त्र अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाल्याचं वृत्त आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विचारी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमधील त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अजरामर राहिल्या . ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा झाला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू हजर होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. तन्वीर हा त्यांचा मुलगा होता त्याचं निधन झाल्यानंतर डॉ. लागू यांनी त्याच्या नावाने पुरस्कार सुरु केला होता.
डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी १९६९ मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता. रंगभूमीचं चालतंबोलतं विद्यापीठ अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत.
अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमीवरचं ‘नटसम्राट’ हे नाटक त्यांच्यासाठी लिहिलं गेलं होतं. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि ते कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.