Aurangabad Crime : बॅग लिफ्टिंग करणाऱ्यांची टोळी गजाआड , गुन्हे शाखेचे कारवाई

औरंगाबाद : शहराच्या विविध भागातून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या ६ जणांच्या टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. अटक केलेल्या टोळीतील सहाही आरोपी तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत. टोळीच्या ताब्यातून २५ मोबाईल, ५ दुचाकी, बॅग लिफ्टिंग साठी लागणारे साहित्य जप्त केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी (दि.९) पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाश नारायण मेकला, राजू नारायण कोलम, राजू यादगीर बोनाला,जोसेफ नारायण मेकला, अशोक नारायण पोटम, सर्व राहणार चेन्नई, तामिळनाडू, सुरेश अंडीया होणालू, राहणार विजयवाडा, आंध्र प्रदेश असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पैठण येथील नारळा, आणि संतनगर परिसारातून आवळल्या. या टोळीने औरंगाबाद मध्ये ६ बॅग लिफ्टिंग केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झीने, राजेंद्र सोळुंके, नितीन देशमुख, संदीप क्षीरसागर, दादासाहेब जहारगड, प्रभाकर राऊत आदींनी केली.
अटक करण्यात आलेल्या टोळीकडून उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोपेड च्या डिकीतून भारलेले १ लाख ५० हजार रुपये, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कारची काच फोडून लंपास केलेले २ लाख १८ हजार रुपये, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार मधून लांबवले २ लाख ४० हजार रुपये, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोपेड च्या डिकीतून चोरलेले ५०,००० रुपये , वेदांत नगर पोलिस ठाणे ठाण्याच्या हद्दीतून डिकीतून चोरलेले एक लाख रुपये , जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कारची काच फोडून पाठविलेले एक लाख ५० हजार रुपये, क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कोरलेले एक लाख रुपये असे गुन्हे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे हे गुन्हे त्यांनी मार्च , नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केलेले आहेत.