Maharashtra : विधी मंडळाचे अधिवेशन संस्थगीत : मुख्यमंत्री

मुंबईत सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित करण्यात आले आहे. सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण वाढू नये आणि राज्यात अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध व्हावे या कारणामुळे अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधासभेत स्पष्ट केले.
राज्याचे अधिवेशन सुरू असताना नेहमीच सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण येत असतो. भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मुंबई आणि राज्यातही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अशा स्थितीत राज्याच्या सुरक्षेला प्राथमिकता देत हा निर्णय घेतला गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभेत आपले निवेदन सादर करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या सदर्भात पोलीस विभागाशी चर्चा झाली. अधिवेशन संस्थगित केल्यास पोलिसांना अधिकचे बळ उपलब्ध होईल. याबाबत विचार करण्यासाठी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर विरोधी पक्षांचे नेते आणि गटनेत्यांची आज बैठक बोलावली. राज्यात सुरेक्षेबाबत अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असल्यानेच अधिवेशनाचे कामकाज आटोपते घ्यावे असा सर्वानुमते निर्णय घेतला अशी माहिती देत मुख्यमत्र्यांनी सभागृहात दिली.
अधिवेशन संस्थगित करण्यामागे कोणताही भीतीचा भावना नसून राज्याला अतिरिक्त पोलीस बळ मिळावे हाच याचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला.
कामकाज सल्लागार समितीने ठरवलेल्या कामकाजानुसार शनिवारपर्यंत चालणार होते. अंतरिम अर्थसंकल्प आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर चर्चा होणार होती.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारताचा विंग कमांडर अभिनंदन यांना सोडून द्यावे, तसेच पाकिस्तानने शत्रसंधीचे केलेले उल्लंघन ताबडतोब थांबवावे याबाबतचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांचा हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले.