मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना राज्याच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्याने सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती मिळाली आहे. संजय बर्बे हे १९८९ च्या बॅचचे, तर सुबोधकुमार जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेेत.
राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्द या महिनाअखेरीस पूर्ण होत आहे.
सुबोध जयस्वाल यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होत असताना, बर्वे यांचे नाव शर्यतीत होते. सतीश माथुर पोलीस महासंचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी तेव्हाचे मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी सुबोध जयस्वाल आणि बर्वे यांची नावे चर्चेत होती. त्यावेळी मात्र बर्वे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाने हुलकावणी दिली होती. त्यावेळी त्यांचा राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.