Aurangabad : लाचखोर सहाय्यक निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, भंगार व्यावसायीकाकडून लाच घेणे भोवले

औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळुज परिसरातील भंगार व्यावसायीकाकडून ८० हजाराची लाच घेणार्या सहाय्यक निरीक्षकासह दोघांना अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने गुरूवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. राहुल भास्करराव रोडे (वय ३५, रा.नवभारत हौसींग सोसायटी, सिडको एन-८) असे लाचखोर सहाय्यक निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती अॅन्टी करप्शन विभागाच्या सुत्रांनी दिली.
एमआयडीसी वाळुज परिसरात तक्रारदार ३० वर्षीय तरूणाचा भंगाराचा व्यवसाय आहे. भंगार व्यावसायीकावर तसेच त्याच्याकडे भंगार विक्री करणार्या ८ महिलांवर कारवाई करून गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे यांनी २ लाख रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ८० हजार रूपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान, तक्रारदार भंगार व्यावसायीकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. अॅन्टी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर अधिक्षक अनिता जमादार , उपअधिक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनखाली अन्य अधिकार्यांनी एम आय डी सी वाळूज ठाणे परिसरात सापळा रचून सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, सहाय्यक फौजदार शेख अन्वर शेख निसार (रा.रशिदमामू कॉलनी) व गोरे नावाच्या जमादारास ८० हजाराची लाच घेतांना पकडले.याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.