भाजपच्या शिष्ट मंडळाची राज्यपालांशी चर्चा , पक्ष नेतृत्व निर्णयासंबंधी विचार करीत असल्याची माहिती

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील सत्तापेचावर कायद्याच्या अंगाने चर्चा केली, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब लागत आहे. मात्र, राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर पक्ष नेतृत्व विचार करून योग्य तो निर्णय घेईल असे पाटील राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी माहिती दिली.
गेले १४ दिवस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याने दोन्ही पक्षात सहमती होताना दिसत नाही. राज्यातील सरकार महायुतीचेच बनेल, मात्र, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. तर, भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समान वाटप होईल असे आश्वासन आपल्याला दिल्यामुळे तो शब्द पाळला गेला, तरच सरकार स्थापन करू अन्यथा आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. दोन्ही बाजूंकडील चर्चा पूर्णपणे थांबलेली असून हा डेडलॉक कसा तोडला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष लागले आहे.