ताजी बातमी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीत घेणार अमित शहा यांची भेट, राज्यात लवकरच सरकार स्थापनेचा विश्वास

महायुतीला बहुमत मिळूनही शिवसेनेने सत्ता स्थापनेत निर्माण केलेला अडथळा आणि अवकाळी परतीच्या पावसामुळे राज्यातील ५२.४४ लाख हेक्टर मधील पिकांचे झालेले नुकसान या दोन्हीही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात आहेत. दरम्यान अकोला येथे बोलताना त्यांनी लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यातील विधानसभेचे २४ ऑकटोबरला निकाल लागल्यानंतर भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्याने महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे मनसुबे असताना महायुतीतील मित्र पक्ष शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून अडचण निर्माण केल्याने महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. याउलट भाजप -सेनेचे नेतेचे नेते परस्परांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे आणि सत्तेतही सामान वाट मिळावा अशी सेनेची मागणी आहे . विशेषतः मुख्यमंत्रीपदावरून या दोन्हीही पक्षात मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेनेने आपल्या बाजूने चर्चा पूर्णतः थांबवली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणारही होते परंतु शिवसेनेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दि . ४ नोव्हेंबर रोजी दिल्लीला जात आहेत.
आज मुख्यमंत्री फडणवीस अकोला दौऱ्यावर होते . राज्यातील पिकांची पूर्णतः नासाडी झाली असून त्यासाठी त्यांनी १० हजार कोटींच्या अर्थसहाय्याची मागणी केली आहे . हि रक्कम अपुरी पडेल अशी टीका विरोधकांनी केली आहे . या विषयावरही मुख्यमंत्री केंदीय गृहमंत्री महित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत .
मुख्यमंत्र्यांनी अकोल्याचा दौरा करत नुकसानाची पाहणी केली. पवासामुळे हाताशी आलेला हंगाम नष्ट झाला आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. पण शेतकऱ्यांनी चिंता करू नये. त्यांना सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पण यावेळी त्यांनी काळजीवाहू सरकारची अडचणही नमूद केली. काळजीवाहू सरकारला काम करताना अडचणी येतात. मात्र, राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमधील शेतकर्यांच्या शेतांमध्ये जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. ऑक्टोबरच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.