Aurangabad : शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजारांची भरपाई द्यावी : उद्धव ठाकरे यांची मागणी

शिवसेना सत्तेत असेल कि नाही, हे लवकरच कळेल…
राज्यात सर्वत्र नव्या सत्ता स्थापनेवरुन चर्चा रंगलेली असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले कि, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्याची गरज आहे. शासनाने जाहीर केलेली १० हजार कोटींची जाहीर झालेली मदतही अत्यंत त्रोटक आहे. तर जाता जाता परतीचा पाऊस मी पुन्हा येईन म्हणतो, त्याची भीती वाटते, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावताना ते म्हणाले की, शिवसेना सत्तेत असेल की नाही हे येणाऱ्या दिवसांत कळेलच.
पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा नसतो, असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.
अशा या संकटाच्या परिस्थितीत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या मदतीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. पावसाने शेतात पाणीच पाणी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेताचाच नव्हे तर त्यांच्या आयुष्याचा चिखल झाला आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करुया. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्य सरकारने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदतही अत्यंत त्रोटक असल्याचं ते म्हणाले.
पिक विमा कंपन्यांनीही आताच्या घडीला कागदी घोडे नाचवू नये. शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. तसंच बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा देणं थांबवावं अन्यथा विमा कंपन्यांप्रमाणे सर्व बँकांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून यावे. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.