राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. जयंत पाटील यांनीच प्रथम अजित पवार यांचं नाव सूचवलं. त्याला जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह उपस्थित सर्व नेत्यांनी अनुमोदन दिलं.
पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली. निवडीनंतर अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपला टोला लगावला. पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळी गोड खाता आली नाही असं ते म्हणाले. आम्ही निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे आनंदी नाहीत, असं ते म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीत महाआघाडीनं केलेल्या कामाचाही आढावा घेतला. विदर्भातील जनतेनं सहा आमदार निवडून दिले आहेत, त्यामुळं आपल्याला विदर्भात लक्ष देण्याची गरज असल्याचा संदेश दिला आहे, असं ते म्हणाले. अहमदनगरमध्ये महाआघाडीला शून्यावर आणणार असल्याचं सांगितलं गेले होतं. पण तेथील जनतेनं १२ पैकी सहा आमदार निवडून दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.