जम्मू -काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानचे धमकावणे चालूच , भारताच्या मित्र राष्ट्रांनाही क्षेपणास्त्र डागण्याची धमकी

Minister for Kashmir Affairs, Gandapur is back and how: "any country that will not stand with Pakistan over Kashmir will be considered our enemy and missiles will be fired at them as well, in case of war with India."
I hope Trump received the message. pic.twitter.com/lcwuZwJiNq— Naila Inayat (@nailainayat) October 29, 2019
जम्मू-काश्मीर आणि कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानची आगपाखड काही केल्या थांबत नसून याच कारणावरून पाकिस्तानच्या एका मंत्र्यानं भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांना धमकावलं आहे. काश्मीर मुद्द्यावर भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर क्षेपणास्त्र हल्ला करू, अशी धमकी पाकिस्तानचे मंत्री अली अमीन गंडापूर यांनी दिली आहे. याआधी पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती.
यापूर्वीही जम्मू -काश्मीर आणि कलम ३७० रद्द केल्यामुळं बिथरलेल्या पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली होती. त्यात आता आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे. भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर क्षेपणास्त्र डागू अशी धमकी मंत्री अली अमीन गंडापूर यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे.
‘काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला तर नाइलाजास्तव आम्हाला युद्ध करावे लागेल. अशा परिस्थितीत जो देश भारताला पाठिंबा देईल त्यांना आम्ही शत्रू मानू आणि भारतासह त्या देशांवरही क्षेपणास्त्र हल्ला करण्यात येईल,’ असं गंडापूर धमकावताना त्या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तानातील एका पत्रकारानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हायरल झाल्यानंतर भारतासह इतर देशांना धमकावणाऱ्या अली अमीन यांच्यावर टीका होत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा भारत सरकारनं निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. याआधी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांच्या अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत.
विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच अली अमीन यांनी हे विधान केलं आहे. पाकिस्तानचा प्रमुख सहकारी मानला जाणारा सौदी अरेबिया हा दहशतवादविरोधी मोहिमेत भारताला पाठिंबा देत आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनीही भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती. आता पारंपरिक पद्धतीनं युद्ध होणार नसून, अण्विक युद्ध होईल, असं त्यांनी धमकावलं होतं.