आ . बच्चू कडू यांच्या प्रहारचा शिवसेनेला पाठिंबा

Shiv Sena gets support of 2 more MLAs of Prahar Janshakti Party. Bachchu Kadu of Achalpur assembly constituency and Rajkumar Patel of Melghat assembly constituency met Shiv Sena Chief Uddhav Thackeray last night and extended their support to him. #Maharashtra pic.twitter.com/VaWe4jLQ6T
— ANI (@ANI) October 27, 2019
राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली तीव्र झाल्या असून आज दिवाळीच्या दिवशीही अपक्ष आमदार भाजप -सेनेच्या संपर्कात आहेत . बच्चू कडूंच्या ‘प्रहार जनशक्ती’ने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. आतापर्यंत शिवसेनेला चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये बच्चू कडूंच्या ‘प्रहार जनशक्ती’चे दोन आणि दोन अपक्ष आमदारांचा सहभाग आहे.त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६० वर पोहोचले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी पाठिंब्याचे पत्रच उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार तर राजकुमार पटेल हे मेळघाटचे आमदार आहेत. अचलपूर आणि मेळघाट या मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच दिव्यांग आणि आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी, करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी विदर्भाच्या रामटेकमधून आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर या दोघांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आणि आमचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं सांगितलं.
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. राज्यात १०५ जागांसह भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर ५६ जागांसह शिवसेना दुसऱ्या आणि ५४ जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीचं सरकार येणार हे निश्चित मानले जाते मात्र, शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळणार का? की शिवसेना कुठल्या वाटाघाटीवर भाजपाला टेकू देणार. अथवा मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात सत्तेची नवी समीकरणं आखणार. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.