भाजपला सत्तेपासून रोखण्यास काँग्रेस आतूर , शिवसेनेला सत्ता स्थापनेत मदत करण्याची दिली खुली ऑफर !!

विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना , शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. मात्र आमच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची शिवसेनेने मानसिकता तयार करावी. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास त्यावर गंभीरपणे विचार करता येईल, असं सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही ऑफर शिवसेना स्विकारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले कि , आम्हाला या निवडणुकीत ४४ जागा मिळाल्या आहेत. अपेक्षित नसतानाही जनतेने आम्हाला चांगला कौल दिला आहे. मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असून आम्ही विरोधी पक्षात बसून जबाबदारीने काम करणार आहोत, असं सांगतानाच जनमताचा कौल पाहता मतदारांनी भाजप आणि शिवसेनेविरोधात कौल देऊन त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थाने हा सत्तेविरोधातील कौल आहे, असं थोरात यांनी सांगितलं. शिवसेनेकडून सत्ता स्थापण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, पण त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रस्ताव आल्यावर विचार करू, असंही थोरात यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या परफॉर्मन्स विषयी बोलताना ते म्हणाले कि , या निवडणुकीत आम्हाला मतं चांगली मिळाली. मतविभागणीमुळे आमची संख्या घटली आहे. काही हरकत नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू. शहरी भागात आम्हाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शहरी भागात काँग्रेसचा जनाधार वाढवण्यावर भर देण्यात येईल, असंही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने जे ठरवलं होतं, ते निभावलं आहे. आम्ही सर्वांनी जोमाने प्रचार केला. निवडणुकीपूर्वीपासून मी अनेक सभा घेतल्या. राजस्थान, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसहीत अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन मोठ मोठ्या सभा घेतल्या, असं सांगताना त्यांनी काँग्रेससाठी प्रचार करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली.
दोन्ही काँग्रेसला राज्यात चांगलं यश मिळालं आहे. त्या तुलनेत भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता आमदारांची मानसिकता बदलली असून १० आमदारांनी आम्हाला संपर्क केला आहे, असा दावा थोरात यांनी केला. मात्र हे दहा आमदार भाजप-शिवसेनेचे आहेत की अपक्ष हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या संपर्कात असलेले ते दहा आमदार कोण? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मीडियाला खोटा सर्व्हे देणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या या एजन्सींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी. असा सर्व्हे देताना मीडियानेही काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही थोरात यांनी दिला. निवडणुकीपूर्वी मीडियाने दाखविलेले सर्व एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. त्यांनी जे उमेदवार पराभूत होणार म्हणून दिवसभर सांगितलं, ते उमेदवार ५० हजार ते लाखाचं मताधिक्य घेऊन जिंकले आहे. त्यामुळे मीडियाला सर्व्हे करून देणाऱ्या या एजन्सींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.