औरंगाबाद : मतदानाचा फोटो व्हाटसअॅपवर व्हायरल, एकाविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी केंद्रात मोबाईल नेण्याची परवानगी नसताना देखील बरेच मतदार मोबाईलचा सर्रास वापर करताना दिसून आले. निवडणुक आयोगाने मतदारांनी मोबाईलचा वापर मतदान केंद्रात करु नये असे स्पष्ट आदेश दिले होते. तरी देखील मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरला. याचदरम्यान एकाने प्रत्यक्ष केलेल्या मतदान प्रक्रियेचा फोटो काढून तो व्हॉटसअपवर पाठवला. हा प्रकार समोर आल्यावरुन सायबर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान एका तरुणाने मतदान करतानाचा प्रत्यक्ष व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केला होता. त्यावरुन त्याच्याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी देखील एकाने मतदानाचा फोटो फेसबुकवर व्हायरल केला. या फोटोची दखल घेऊन एका दुरचित्रवाहिनीने त्याबाबतचे वृत्त प्रदर्शित केले होते. त्यावरुन सोमवारी पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याने एका तरुणाविरुध्द महिला पोलिस शिपाई शिल्पा तेलोरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाचा सायबर पोलिस शोध घेत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल चव्हाण करत आहेत.