Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : एमआयएम कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिसात गुन्हा, परस्परविरोधी तक्रारीनंतर कदीर मौलानांची जामीनावर मुक्तता

Spread the love

एमआयएम-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोमवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना समोरासमोर भिडले. या भांडणाचे रुपांतर सायंकाळी कटकट गेट भागात हाणामारीमध्ये झाले. त्यातूनच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जिन्सी परिसर दणाणून सोडला. एकसारखी घोषणाबाजी सुरू असल्यामुळे जिन्सी पोलिसांनी एमआयएमच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुध्द शस्त्रबंदी आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मंजूरपुरा भागात एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. एमआयएमचा कार्यकर्ता अब्दुल कासीफ खान (रा. मोमीनपुरा) याने सिटीचौक पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंजूरपुरा येथील बुथ क्र. १७८ आणि १७९ पासून शंभर मीटरबाहेर एमआयएमच्या पोलचीटचे काम करत होतो. त्यावेळी कार्यकर्ता मुजफ्फर खान याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे काम का करतो असे म्हणत धमकावले.

यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांचा मुलगा ओसामा, कार्यकर्ते सय्यद फैय्याज, मुजफ्फर अतिक, सलीम टँकर, मुजाहीत मॉन्टी आणि जाहीद यांनी टेबलला लाथ मारली. तसेच याठिकाणी तुम्ही काम करु नका असे म्हणत ओसामाने अब्दुल खानला बाजूला नेले. याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजयराज साळवे यांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मारा त्यांना सोडू नका असे म्हणताच सलीम टँकर याने लोखंडी रॉडने अब्दुल खानच्या उजव्या बरगडीवर मारा केला. हा प्रकार पाहुन मुजफ्फर खानने भांडण सोडविले. याप्रकारानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कटकट गेट भागात इमरान अब्दुल अजीज कादरी (२८, रा. बाबर कॉलनी) याला एमआयएमचे काम का करतो म्हणत उमेदवार कदीर मौलाना, माजी विरोधी पक्षनेता अज्जू पहेलवान, सय्यद अख्तर, ओसामा व मौलानाचा भाऊ यांच्यासह दहा ते बारा जण तेथे गेले. त्यांनी एमआयएमला मदत का करतो म्हणत शिवीगाळ व मारहाणीला सुरूवात केली.

या मारहाणीत इमरान कादरीसोबत आदील नाजेर पठाण हा जखमी झाला. हे भांडण सुरू असताना जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दोन्ही गटाला बाजूला केले. त्यानंतर सगळे सुरळीत सुरू असताना नेमके खासदार इम्तियाज जलील तेथे आले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला नियंत्रणात आणून पांगवल्यामुळे  वाद थांबला.
……


अन् गालबोट लागले……
सायंकाळी पाचपर्यंत निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, साडेपाचच्या सुमारास खासदार इम्तियाज जलील हे कटकट गेट येथे आल्यावर वाद वाढला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इमरान आणि आदील पठाण यांना मारहाण केल्याचे जलील यांना कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी उमेदवार कदीर मौलाना मतदान केंद्राच्या एका पोलचीट टेबलजवळ बसलेले होते. जलील यांनी कदीर मौलाना यांना पाहताच त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दिवसभर शांततेत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला शेवटच्या क्षणी गालबोट लागले.


नेमके काय घडले….
कदीर मौलाना आणि खासदार जलील हे कटकट गेट भागात समोरासमोर भिडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये खासदार जलील यांना कार्यकर्ते बाजूला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. पण या दोघांमध्ये नेमकी हाणामारी झाली की नाही हे समजू शकलेले नाही. त्यातच खासदार जलील देखील आपण त्यांना हिसका दाखवला आहे. एवढेच सांगत असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.


घोषणाबाजीमुळे गुन्हा दाखल…..
कदीर मौलाना यांच्या घरावर रात्री एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच त्यानंतर घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जमाव जिन्सी भागात फिरला. त्यामुळे पोलिसांनी समीर साजेद बिल्डर, नगरसेवक जफर बिल्डर, सलमान हुसेनी, मझहर खान व त्यांच्यासोबतच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!