महाराष्ट्र विधानसभा २०१९ : ‘ईडी’ची भीती दाखवू नका, मी मेल्या आईचे दूध प्यायलो नाही, तुमच्या ‘ईडी’लाच ‘येडी’ करून टाकीन : पवारांची टोलेबाजी

मला ‘ईडी’ची भीती दाखवू नका. मी मेल्या आईचे दूध प्यायलो नसून मी तुमच्या ‘ईडी’लाच ‘येडी’ करून टाकीन, अशी तुफानी टोलेबाजी आज शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये केली. देशातले मोदी सरकार सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापरण्याऐवजी राजकीय विरोधकांवर वापरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत, तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे अशी तुफान टोलेबाजी पवारांनी आज केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आज येथील शिवतीर्थावर पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपाठीवार राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आवर्जून उपस्थित होते.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याबाबत वक्तव्य केले असतानाच राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब गंभीर असून शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ते काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा घणाघात पवार यांनी केला.
छत्रपतींच्या जाज्वल पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांवर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला लागले आहेत, असे सांगत तुम्हाला हेच करायचे असेल तर जाना मोडनिंबला, असा टोला पवारांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी लक्ष्य केले. तुम्ही दुसऱ्याला उभे करून कुस्तीची भाषा करताय मात्र आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात, हे २४ तारखेला दिसेल, अशी फटकेबाजी पवारांनी केली.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांना चिमटा घेतला. भालके गेले दोन महिने भाजप आणि शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते मात्र शेवटी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भालके जाणार म्हणून आम्ही पंढरपूरमधील काँग्रेसची उमेदवारी शिवाजी काळुंगे यांना दिली होती. मात्र आता भारत भालके हेच काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, असे सांगत काळुंगे यांनी उमेदवारी मागे घेतली नसली तरी आमचे उमेदवार भालकेच असल्याचा निर्वाळा दिला.