सातारा : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे , मोदींच्या सभेला आले खरे पण कोणीच दखल न घेतल्याने , भाषण संपायच्या आधीच घेतला काढता पाय…

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गरुजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साताऱ्यातील सभास्थळी आले. सभामंडपातील व्हीआयपी कक्षापर्यंत पोलीस बंदोबस्तात ते पोहोचलेही. सर्वांनी त्यांना पाहिलेही परंतु, काही वेळ निघून गेला, तरी त्यांना अपेक्षेप्रमाणे सभामंचावर आमंत्रित करण्यात आले नाही किंवा भाषणातही त्यांची कोणीही दखल घेतली गेली नसल्याने, पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असतानाच भिडेंनी सभेतून काढता पाय घेणे पसंत केले आणि ते आले तसे निघून गेले.
वास्तविक भिडे गुरुजी मागील दहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करायचा होता. मात्र, सभेच्या ठिकाणी कोणी योग्य ती दखलच न घेतल्यामुळे ते काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. भिडेंच्या या अनपेक्षित कृतीमुळे सभेला उपस्थित असलेल्या सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केल्याचे दिसून आले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेच्या निमित्ताने प्रथमच साताऱ्यात येणार असल्याने व येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर दुपारी २ वाजता मोदी यांचे आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपासून साताऱ्याला अक्षरश: पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. त्यात आज सभेचा दिवस असल्याने सकाळपासूनच साताऱ्यात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती.
सैनिक स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाणाऱ्या सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देखील पोलिसांनी अडवल्याचे दिसून आले. पोलिसांच्या या वागणुकीमुळे मात्र जिल्हाधिकारी चांगल्यात संतापल्या होत्या. लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच साताऱ्यात आले होते. तर, आज तब्बल ३० वर्षानंतर एखाद्या पंतप्रधानांनी साताऱ्याला भेट दिली आहे. म्हणूच साताऱ्यात अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सभेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणासह स्थानिक पोलिसांनीही कंबर कसली होती. शिवाय तीन दिवसांपासून साताऱ्यासह सुमारे चार ते पाच जिल्ह्यातील पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला होता. मदतीला राज्य राखीव पोलिस दलही साताऱ्यात दाखल होते. सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज सकाळी सैनिक स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपली गाडी आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. त्यांनी मी सातारा जिल्हाधिकारी असल्याचे सांगून देखील, पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने जिल्हाधिकारी मॅडम चांगल्याच भडकल्या. अखेर आपल्याला प्रवेश मिळणार नाही हे पाहून त्या निघून गेल्या. इतरवेळी जिल्ह्यातील भल्या भल्या अधिकाऱ्यांना धडकी भरविणाऱ्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी प्रवेश नाकारल्यामुळे घटनास्थळी चांगलीच चर्चा झाली.