भारतरत्न विवाद : सावरकरना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान : कन्हैयाकुमार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या विषयावरून सध्या महाराष्ट्रात वादविवाद चालू आहे. या वादावर बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल, असे मत युवा नेता कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याचे नाव संकल्पपत्र असे ठेवण्यात आले आहे. या संकल्पपत्राच्या मार्फत भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला विविध आश्वासने दिलेले आहेत. या आश्वासनांपैकी एक अश्वासन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्याचे आहे. भाजपच्या याच आश्वासनावरुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारने भाजपवर टीका केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल, असे कन्हैया कुमार म्हणाला आहे. अहमदनगर येथे आयोजित प्रचारसभेत तो बोलत होता. नगरचे भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचाराप्रत्यर्थ तो नगरला आला होता. तर आज सायंकाळी तो औरंगाबाद शहरात भाकपचे उमेदवार अभय टाकसाळ यांच्या प्रचारासाठी आला आहे.
कन्हैया कुमारने भाजपच्या संकल्पपत्रावरुन सडकून टीका केली. ‘महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, मात्र राज्यातील प्रश्नावर कोणी बोलत नाही. प्रत्येक वेळी फक्त ३७० आणि राम मंदिरचा मुद्दे का काढले जात आहेत? भाजपकडून सातत्याने मोदींना पर्याय काय? असा प्रश्न विचारला जात आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि अन्य पर्याय असलेले नेतेमंडळी ईडी चौकशीच्या भीतीने गांधीजींचे गुणगान सोडून नथुराम गोडसेची स्तुती करत आहेत. त्यामुळे आता जनतेकडून पर्याय उभा राहिला पाहीजे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. याशिवाय गेल्या निवडणुकीला भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाले आहेत याबाबत कुणी विचारत नाही आणि भाजपही त्यावर गप्प आहे’, असे कन्हैया कुमार म्हणाला.