पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण लाईव्ह करण्यास नकार , दूरदर्शनचे ‘एएसडी’ निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लाईव्ह दाखवले नाही म्हणून कामात कुचराई केल्याच्या आरोपांवरून चेन्नई दूरदर्शनच्या एका अधिकाऱ्याचा निलंबित करण्यात आलं आहे. प्रसार भारतीने शिस्तभंगाच्या कारणांवरून या अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे . मात्र कारवाई करताना त्यांनी त्याचं कारण सांगितलेलं नाही. सांगूनही या अधिकाऱ्याने पंतप्रधानांचं IIT मद्रास मध्ये झालेलं भाषण दाखविण्यास नकार दिला होता अशी माहिती दिली जातेय. आर वसुमथी असं त्या अधिकाऱ्यांचं नाव असून ते चेन्नईतल्या दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं IIT मद्रासमध्ये दिक्षांत समारोहात ३० सप्टेंबरला भाषण होतं. ते भाषण Live दाखवावं असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र स्पष्ट आदेश असूनही वसुमथी यांनी आदेशाचं पालन न करता भाषण दाखविण्यास नकार दिला होता अशी माहिती दिली इंडिया टुडे ने दिली आहे. IIT मद्रासमध्ये दिक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात तरुणांना इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाबद्दल संशोधन आणि मुलभूत काम करण्याचा सल्ला दिला होता.
सरकारी अधिकारी असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या आदेशाचं पाल करावं लागतं. त्यात जर पंतप्रधानांसारखी महत्त्वाची व्यक्ती असेल तर जास्त काळजी घेतली जाते. मतं पटो किंवा न पटो अधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठांच्या निर्देशांचं पालन करावं लागतं. असं न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाते. त्यामुळे याच नियमांनुसार ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.