भाजपनंतर शिवसेनेची ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर , वरळीतून आदित्य ठाकरेंना संधी

भाजपाने मंगळवारी सकाळी आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर तासाभरात शिवसेनेनेही आपल्या ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोठे अनपेक्षित बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, काही जागांवर वाद सुरु असल्याने त्या जागांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, बीडमधून जयदत्त क्षीरसागर आणि नालासोपाऱ्यातून चकमकफेम प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेची पहिल्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवसांपासून वाद सुरु असलेल्या जागा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री ज्या मतदारसंघात आहे तेथील वांद्रे पूर्व आणि वडाळा नायगाव या आहेत. वांद्रे पूर्वतून विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, स्थानिक पातळीवर या जागेसाठी वाद असल्याने तसेच वडाळ्यातील कॉंग्रेसचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपामध्ये गेले आहेत, आणि त्यांना भाजपाने उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, इथे आपले प्राबल्य असल्याने शिवसेना आपल्या उमेदवारासाठी ठाम आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत होते. आज आदित्य ठाकरे यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला असून ते ३ ऑक्टोबर रोजी वरळीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.