Aurangabad Crime : महामार्गावर लुटमारी करणा-याच्या मुसक्या आवळल्या, ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

औरंंंगाबाद : महामार्गावर चारचाकी वाहनधारकांसह दुचाकी वाहनधारकांना मारहाण करीत लुटमारी करणा-या टोळीतील रवि जगताप काळे (वय २७, रा.शिवराई ता.गंगापुर,ह.मु.सिंधीसिरसगाव) याच्या मुसक्या ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. पोलिसांनी अटक केलेल्या रवि काळे याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या असून महामार्गावर लुटमारी केल्याच्या ६ गुन्ह्यांची त्याने कबूली दिली असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी रविवारी (दि.२९) दिली.
गेल्या तीन ते चार महिन्यापासून औरंगाबाद ते अहमदनगर, मुंबई ते नागपूर हायवेवर वाहनधारकांना अडवून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. महामार्गावर लुटमारी करणारा एक जण सिंधीसिरसगाव येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळंके, जमादार रतन वारे, नवनाथ कोल्हे, बाळु पाथ्रीकर, सुनिल शिराळे, रमेश अपसनवाड, रामेश्वर धापसे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमळे आदींच्या पथकाने सिंधीसिरसगाव येथे सापळा रचून रवि काळे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, रवि काळे याने आपले साथीदार सुरेश संभाजी काळे (रा.शिवराई), विकी ठकसेन काळे (रा.लक्ष्मी गायरान), अजय मिरीलाल काळे (रा.गाढवनाला, सलबतपूर,ता.नेवासा) यांच्या मदतीने औरंगाबाद ते अहमदनगर, मुंबई ते नागपूर महामार्गावर एका कारचालकासह सहा जणांना लुटले असल्याची कबूली दिली.
पोलिसांनी रवि काळे याच्या ताब्यातून दोन दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रवि काळे याचे तिन्ही साथीदार फरार असून पोलिसांची पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.