…. हे फडणवीस काय? नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार ? हे सांगण्याची गरज नाही, पण पंतप्रधानांनी असे बोलायला नको : पवारांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोफ डागल्यानंतर बोलणार नाहीत , उत्तर देणार नाहीत ते शरद पवार कसले ? आपल्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला पवार व्याजासह परत करतात, असा आजवरचा इतिहास आहे आणि त्याची सिद्धता स्वतः पवार यांनी औरंगाबादला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा करून दाखवली.
या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि , “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकला काय बोलले त्याने काही फरक पडत नाही. ते काहीही बोलू शकतात, कारण नागपूरचे त्यांच्यावर संस्कारच हे आहेत. हे फडणवीस काय? नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार ? हे सांगण्याची गरज नाही. मात्र पंतप्रधान जे काही बोलले ते त्यांनी बोलायला नको होतं” असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
पवार म्हणाले कि, ” पंतप्रधान काहीही बोलण्याइतके कर्तृत्त्ववान आहेत. मलाही बोलता येतं पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीतील महत्त्वाचं पद आहे. या पदाची अप्रतिष्ठा मला होऊ द्यायची नाही म्हणून मी शांत आहे ” असे स्पष्ट करून ते म्हणाले कि , पण मला आठवतं कि , “विकासाचा प्रश्न येतो तेव्हा कुणाचा हात धरुन जावं असा प्रश्न पुढे येतो, त्यावेळी शरद पवार हेच नाव माझ्यासमोर येतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. कधी म्हणता माझी करंगळी धरुन चालता, मग निवडणूक जवळ आली की असं का बोलता? हे वागणं बरं नाही” असंही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि , ” महाराष्ट्राने मला भरभरुन दिलं आहे. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चारवेळा मुख्यमंत्री केलं. देशाचा संरक्षण मंत्री केलं. १० वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरुन दिलं. आता आणखी काहीही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे ” असंही शरद पवार यांनी बोलून दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. ” पाकिस्तानचे सत्ताधारी पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी सगळेच पाकिस्तानच्या जनतेची फसवणूक करतात, हे मी बोललो मात्र मोदींनी काय सांगितलं की मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे का? ” असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.